Latest News

एआयजीव्ही बद्दल

 ६ मे २०१० रोजी परमपूज्य अनिरुध्द बापूंचे ’रामराज्य’ या विषयावर प्रवचन झाले. २०२५ साली रामराज्य आणणे हे बापूंचे स्वप्न आहे, ध्येय आहे आणि ब्रीदही आहे. रामराज्याची संकल्पना सांगताना बापू म्हणाले, "रामराज्यामध्ये रामाने जसं राज्य अयोध्येत चालवलं तसं राज्य. अयोध्येतील नागरिक जसे होते तसे सर्वांनी बनणे, तशी समाजव्यवस्था तयार होणे म्हणजे रामराज्य."

ह्यासाठी बापूंनी ’अनिरुद्धाच इन्सिट्यूट आँफ ग्राम विकास’ ह्या संस्थेची स्थापना केली, ज्याचे ब्रीदवाक्यच मुळी - ’रामराज्याचा प्रवास ग्रामराज्याच्या स्टेशनापासून सुरू होतो व ग्रामराज्य म्हणजेच ’ग्रामीण विकास’ असे आहे. कृषिप्रधान भारतदेशामध्ये शेतीव्यवसाय हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. परंतु हरीतक्रांती होऊनसुद्धा निसर्गाचा लहरीपणा, जलसिंचनाचा अभाव, मार्गदर्शन व सुयोग्य ज्ञानाचा अभाव आणि दुबळी राजकीय इच्छाशक्ती ह्यांमुळे शेतीव्यवसाय खात्रीलायक राहिला नाही. रासायनीक खतांचा व कीटकनाशकांचा अमर्याद वापर, नविन दृष्टिकोनाचा अभाव व अडाणीपणा यांमुळे प्रत्येक गावातील छोटा शेतकरी, शेतमजूर कर्जाच्या कधी न सुटणार्‍या अजगरविळख्यात अडकला आहे. ह्यामुळेच आज शेतकरी आत्महत्या करीत आहे.

ही समस्या सोडवण्यासाठी सदगुरु बापूंनी सखोल अभ्यासातून ह्या प्रकल्पाची आखणी करून सुरूवात केली. ह्या प्रकल्पाच्या सुरूवातीस एका विस्तृत सर्वेक्षणाद्वारे प्रत्यक्षपणे शेतकर्‍यांकडे जाऊन त्यांना भेडसावण्यार्‍या समस्यांचे विश्‍लेषण केले गेले. या विश्‍लेषणातून मिळालेल्या माहितीद्वारे ह्या प्रकल्पाची रचना केली गेली. या प्रकल्पाचा आरंभ स्वप्नीलसिंह दत्तोपाध्ये ह्यांच्या मार्गदर्शनाखाली कोठिंबे, कर्जत येथील गोविद्यापीठम येथे एका संक्षिप्त अभ्यासक्रमाद्वारे झाला. शेतकर्‍यांसाठी अत्यंत महत्वाचे  असणारे विविध प्रकारचे विषय, उदा. सेंद्रिय शेती, पशुपालन, जलसंधारण, सामाजीक वनीकरण आणि जोडधंदे ह्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले. ग्रामीण जनता आणि त्यांना उपलब्ध असलेली साधने यांना डोळ्यासमोर ठेवून सदगुरु बापूंनी हया अभ्यासक्रमाची आखणी केली आहे. यामुळे खेड्यातील एखादा शिकलेला किंवा अशिक्षीत शेतकरीसुद्धा या अभ्यासक्रमात सहभागी होउन स्वतःची आर्थिक स्थिती सुधारु शकेल.

आज भारतात हरितक्रांती होऊन एवढी वर्षे झाली पण तरीही गावांतील शेतकरी, शेतमजूर यांची परिस्थिती बदलली नाही. महागडी व सतत बदलणारी बियाणे, रासायनीक खते व किटकनाशके ह्याच्याने जमिनीची हानी होत आहे. सुपिक जमिनी नापीक बनत आहेत. एवढे करूनही शेतमालाला हमी भाव मिलण्याची शक्यता धुसरच आहे. त्यापेक्षा कमी खर्चाची, बिन विषारी, बिनकर्जाची, फायदेशीर सेंद्रिय शेती कशी करायची, शेतावरच सेंद्रिय खते, सेंद्रिय किटकनाशके, घरचे बियाणे कसे बनवायचे व वापरायचे, तसेच पारंपारीक पेरणीच्या केल्या जाणार्‍या शेतीपद्धतीला आधुनीकतेची व विकासाची जोड कशी द्यायची हे 'सेंद्रिय शेती' या पदविका अभ्यासक्रमात आपल्याला शिकायला मिळते.

साधारणपणे शेतकर्‍यांकडे गाई, म्ह्शी, शेळ्या, कोंबड्या असतातच. त्यांच्या व्यवस्थापनात, स्वच्छतेत व आहारात थोडे अधिक लक्ष दिल्यास हे पशुधन आपल्याला अधिक उत्पन्न कसे मिळवून देऊ शकते ते ’पशुपालन’ या पदविका अभ्यासक्रमात शिकायला मिळते.

असे म्हटले जाते की कोणताही माणूस हा उपाशी पोटी प्रगती करु शकत नाही. शेतकर्‍यास विचार करण्यासाठी, काम होण्यासाठी व धन कमविण्यासाठी त्याची अन्नाची मुलभूत गरज भागणे हे अत्यंत गरजेचे आहे. म्हणूनच शेतकर्‍यांना त्यांच्या कडे उपलब्ध असलेल्या जागेतच सकस व स्वत: उगवलेले मोफत अन्न (भाज्या) मिळण्यासाठी ’AIGV’ मध्ये त्यांना परसबाग फुलविण्याचे शिकविले जाते. फक्त थोड्याश्‍या प्रयासांनी व व्यवस्थापनाने शेतकर्‍यांची उपासमारीपासून सहज सुटका होऊ शकते.

एखाद्या गावाला प्रगतीपथावर चालायचे असेल तर फक्त वैयक्तिक पातळीवरील गावकर्‍यांचे प्रयास पुरे पडण्यासारखे नाहीत. त्यासाठी हवी सांघिक कामगिरी व जबाबदारी. ह्या तत्वातूनच ’AIGV’ अंतर्गत गावामध्ये जलसंधारण शिकवण्यात येते. आपल्याच गावाला लागून असणार्‍या ओढे, नद्या, नाले, डोंगर यावर वनराई बंधारे, पायर्‍यांची मजगी, दगडी बांध, समतल थर बांधून कोरडवाहू भागातही जलसिंचनाच्या सोयी तयार करता येतात. गावाच्या सहकार्याने या सर्व गोष्टी कशा बांधायच्या व त्यांचे संवर्धन कसे राखायचे हे ’जलसंधारण’ या पदविका अभ्यासक्रमात शिकल्यास बाराही महीने पाण्याची कमतरता आपल्याला भासणार नाही.

नापीक, पडीक जमिनी, क्षारपिडीत जमिनी हे आजच्या शेतजमिनीचे चित्र आहे. जमिन असूनही पिकवता न  येण्यासारखे दुर्भाग्य ते काय? अशा जमिनी सुपिक कशा करायच्या, त्यांचा कस कसा वाढवायचा तसेच उजाड माळराने, गावाजवळील डोंगर उतारावर सामुदायीक पद्धतीने वनशेती कशी करायची हे आपल्याला ’वनशेती’ या पदविका अभ्यासक्रमात शिकायला मिळते.

कोरडवाहू प्रदेश म्हणजे जेथे फक्त पावसाच्या पाण्यावर शेती केली जाते असा भाग. सिंचनाच्या कोणत्याही सुविधा उपलब्ध नसल्याने फक्त पावसाळ्याच्या महिन्यांत येथे पिक घेतले जाते. महाराष्ट्रातील बरेच जिल्हे हे या कोरडवाहू प्रदेशात मोडतात. आणि मग इथे पाऊसच पडला नाही तर? आज महाराष्ट्रातील निम्म्याहून जास्त जिल्हे दुष्काळी किंवा अवर्षणग्रस्त म्हणून शासनाने मान्य केले आहे. अश्या लोकांनी मग जगायचे कसे? घरची शेतजमिन असूनही धान्य पिकवायचे कसे? अश्या शेतकर्‍यांसाठी कमी पाण्यावर जगणारी पिके, कोरडवाहू प्रदेशात होऊ शकणारी उत्तम फळझाडे, त्यांची लागवड, कलमे पद्धत, त्यांचे उत्पन्न व विक्री याही गोष्टी आपल्याला ’AIGV’त शिकायला मिळतात.

महागाईच्या झळा आज कोणाला बसत नाहीत? शहरातला असो वा ग्रामीण भागातला, सर्वजण या महागाईने ग्रासून गेले आहेत. या परिस्थितीत हातावर पोट असणार्‍या या ग्रामीण भागातील गरीब, गरजू , अडाणी जनतेला आपल्या किमान गरजा भागवण्यासाठी काही ना काहीतरी उद्योगधंदे करणे आवश्यक आहे. निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून असणार्‍या शेतीबरोबरच शेतीपूरक असे जोडधंदे करणे हेच त्याचे उत्तर आहे. त्यासाठी ससे पालन, वराह पालन, मधमाश्या पालन, बटेर पालन तसेच टोपल्या, केरसुण्या बनवणे, कात, डिंक, खडू बनवणे या व अश्या इतर अनेक छोट्या-मोठ्या जोडधंद्यांचे प्रशिक्षण मार्गदर्शन व सराव आपल्याला ’AIGV’च्या ’जोडधंदे’ या अभ्यासक्रमात शिकता येईल.

जगण्यासाठी जशी अन्नाची गरज आहे तसेच शरीर नीट राखण्यासाठी निरोगी व सुदृढ जीवन असण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आरोग्य व स्वच्छता या दोन्ही गोष्टींवर भर द्यायला पाहिजे. मा़झे आरोग्य चांगले राहिले तरच माझ्या गावाचे आरोग्य चांगले राहणार. माझे घर साफ तरच माझे गाव स्वच्छ. रोगराईमुक्त, आजारमुक्त, गाव कसे बनवायचे, तसेच रोजचे व्यवहार बघण्यापूरते व फसवणूक टाळण्यापुरते साक्षर कसे बनायचे हे आपल्याला ’AIGV’च्या 'स्वच्छता, आरोग्य व साक्षरता' या पदविका अभ्यासक्रमात शिकायला मिळ्ते.

’AIGV’ म्हणजे ग्रामविकासाचा एक संपूर्ण, स्वयंसिद्ध व समग्र दृष्टीकोन आहे. गावातील अडाणी, गरजू, गरीब, कष्टकरी जनतेला सक्षम, सुदृढ व सुखवस्तू बनवण्यासाठीच अनिरुद्ध बापूंनी 'AIGV'ची स्थापना केली. या सर्वांना आपला विकास करून घेण्याची एक दिशा दाखवली आहे. बापूंच्या संकल्पनेतील रामराज्य आणण्यासाठी आता आपल्याला काहीतरी करण्याची गरज आहे. तेव्हा आपापल्या उपासना केंद्रांमार्फत या पदविका अभ्यासक्रमाची तयारी व आपल्याच केंद्रात किंवा आजूबाजूच्या गावात जाऊन बापूंच्या या योजना राबवण्याठी आता कंबर कसली पाहिजे. श्रद्धायुक्त भक्ती व भक्तीयुक्त सेवा हे बापूंचे दोन चरण आणि त्या चरणांच्या पदस्पर्शासाठी आसुसलेले माझे या गावांमध्ये जाऊन रामराज्य आणण्यासाठी कष्ट करणारे हात हाच माझा बापू चरणी नमस्कार.

No comments:

Post a Comment